मूल शहरातील मेन रोडवरील वाढत्या वाहतूक कोंडीवर तातडीने तोडगा काढण्यात यावा, तसेच चामोर्शी रोड नाका ते इको पार्क परिसरात रस्त्याच्या दुतर्फा होणाऱ्या बेकायदेशीर वाहन पार्किंगवर कडक कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी आदिवासी आघाडी च्या वतीने रिना मसराम अध्यक्षा यांच्या नेतृत्वात व सौ. गिताताई अमदुर्तीवार, सौ. संजना मडावी यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 29 सप्टेंबर रोज मंगळवारला मूल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री राठोड साहेब व श्री दोडे साहेब, मुख्याधिकारी नगर परिषद मूल यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद केल्यानुसार, चामोर्शी रोड नाका ते इको पार्क या मार्गावर अनेक ट्रक, ट्रॅव्हल्स व इतर चारचाकी वाहने अनधिकृतपणे दीर्घकाळ पार्क करून ठेवली जातात. यामुळे रस्त्याची रुंदी कमी होऊन नाहक वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. या अनियंत्रित वाहतुकीमुळे नागरिक, शालेय विद्यार्थी, महिला व वृद्धांना प्रचंड मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शहरात यापूर्वीही अपघातात काहींचा जीव गेला असून भविष्यात मोठा
अपघात घडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
प्रमुख मागण्या:
* चामोर्शी रोड नाका ते इको पार्क रस्त्यावरील अनधिकृत वाहनांवर तात्काळ दंडात्मक कारवाई करून अडथळे दूर करावेत.
* गांधी चौक, आठवडी बाजार रोड व शाळा-कॉलेज परिसरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी कायमस्वरूपी वाहतूक पोलीस तैनात करण्यात यावेत.
* गांधी चौक ते सोमनाथ रोड आणि गांधी चौक ते विश्रामगृह रोडवरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ठोस योजना आखावी.
* मेन रोडवर शिस्त आणण्यासाठी ठिकठिकाणी 'नो-पार्किंग झोन' घोषित करून अंमलबजावणी करावी.
हे निवेदन देताना भा.ज.पा. व आदिवासी आघाडी मूल शहराच्या इंदुताई मडावी, सौ. ममता कुसराम, श्रीमती उषाताई थोराक, श्रीमती शुभांगी चावके, शिल्पा इटनकर, विभा मुनघाटे, यांच्यासह इतरही महिला उपस्थित होत्या. तसेच या निवेदनाची प्रत मूल-बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार व माजी मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनाही माहितीसाठी पाठवण्यात आली आहे. प्रशासनाने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन शहरवासीयांना दिलासा द्यावा,
अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
संपादक
रवी वाळके
दे दणका न्यूज मुल
जाहिरात व बातम्या करीता संपर्क साधावा
मो,9552358222
