विद्यार्थ्यांसह रुग्ण, महिला, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी व सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा !
रवी वाळके/दे दणका न्यूज मुल
मूल शहर व तालुक्यातील नागरिकांची अनेक दिवसांपासूनची मागणी अखेर पूर्णत्वास आली आहे. आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून, उद्यापासून सकाळी ७ वाजता मूल–नागपूर थेट एसटी बससेवा सुरू होत आहे.
या बससेवेमुळे मूलकरांना नागपूर गाठण्यासाठी चंद्रपूर किंवा इतर मार्गांचा आधार घेण्याची गरज कमी होणार असून, प्रवासातील वेळ आणि आर्थिक खर्चाची बचत होणार आहे.
चंद्रपूरहून सकाळी ६ वाजता बस सुटून सकाळी ७ वाजता मूल येथे पोहोचेल आणि त्यानंतर ही बस थेट नागपूरकडे रवाना होईल. त्यामुळे पहाटेच्या वेळेत प्रवास करणाऱ्या नागरिकांसह चंद्रपूर, मूल, सिंदेवाही, नागभीड आणि ब्रह्मपुरी परिसरातील प्रवाशांनाही या बससेवेचा लाभ मिळणार आहे.
नागरिकांच्या मागणीची आमदारांनी घेतली दखल
मूल–नागपूर थेट बससेवा बंद झाल्यामुळे विद्यार्थी, रुग्ण, महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, व्यापारी, कर्मचारी तसेच सर्वसामान्य प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. शिक्षण, उपचार, रोजगार, व्यापार तसेच शासकीय कामांसाठी नागपूरला जाणाऱ्या नागरिकांना चंद्रपूरमार्गे किंवा इतर पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागत होता. परिणामी प्रवासाचा वेळ आणि खर्च दोन्ही वाढत होते.
ही नागरिकांची अडचण लक्षात घेऊन आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी एसटी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. नवरात्रोत्सवापूर्वी मूल–नागपूर बससेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी त्यांनी परिवहन मंत्र्यांकडे पत्राद्वारे केली होती.
पाठपुराव्याचे फलित; मूलकरांना थेट नागपूरची जोडणी
आमदार मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर मूल–नागपूर थेट बससेवा सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली नागरिकांची मागणी मार्गी लागली असून, मूल शहराला पुन्हा एकदा नागपूरशी थेट एसटी वाहतुकीची जोडणी मिळणार आहे.
पूर्वी या मार्गावर दिवसातून अनेक एसटी फेऱ्या उपलब्ध होत्या. त्यामुळे मूलकरांसाठी नागपूरकडे जाणे अधिक सोयीचे होते. आता पुन्हा थेट बससेवा सुरू होत असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
“मूलकरांची मागणी केवळ मागणी न राहता ती प्रत्यक्षात उतरली”, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत असून, या बससेवेमुळे विद्यार्थी, रुग्ण आणि नोकरदार वर्गासह सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
संपादक
रवी वाळके
दे दणका न्यूज मुल
जाहिरात व बातम्या करीता संपर्क करा
मो,9552358222
