सुशी-केळझर-अजयपूर महामार्गाची दुरवस्था; कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे नागरिक हैराण




रवि वाळके / दे दणका न्यूज, मूल

शासनाकडून ग्रामीण भागातील नागरिकांना सुरक्षित व सुलभ प्रवासाची सुविधा मिळावी यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून रस्त्यांची कामे हाती घेतली जात आहेत. मात्र मूल तालुक्यातील सुशी-केळझर-अजयपूर महामार्गाच्या कामात कंत्राटदाराच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सदर रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी शासनाने कोट्यवधी रुपयांची निविदा मंजूर केली. कामाची सुरुवात करताना कंत्राटदाराने जेसीबीच्या साहाय्याने रस्त्याचे अनेक ठिकाणी खोदकाम करून जुना रस्ता उखडून टाकला. मात्र त्यानंतर अनेक महिने उलटूनही काम पूर्ण करण्यात आले नसल्याने संपूर्ण मार्गाची अवस्था बिकट झाली आहे.
हा मार्ग परिसरातील अनेक गावांना जोडणारा प्रमुख दळणवळणाचा मार्ग आहे. दररोज शेकडो नागरिक, विद्यार्थी, शेतकरी तसेच व्यापारी सायकल, दुचाकी व चारचाकी वाहनांनी या मार्गावरून प्रवास करतात. रस्त्यावर जागोजागी खड्डे, उखडलेले भाग आणि धुळीचे साम्राज्य निर्माण झाल्याने अपघाताचा धोका वाढला असून नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
विशेष म्हणजे, काम सुरू केल्यानंतर ते अर्धवट अवस्थेत सोडून दिल्याने शासनाचा निधी खर्च होऊनही जनतेला कोणताही लाभ मिळत नसल्याची भावना व्यक्त होत आहे. संबंधित विभागाने कंत्राटदाराच्या कामाची चौकशी करून तातडीने रस्ता पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

रस्ता खोदला, पण काम गायब!

सुशी-केळझर-अजयपूर महामार्गावर जेसीबीने रस्ता उखडून अनेक महिने उलटले तरी कामाची गती दिसत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, "काम सुरू केले तर पूर्ण करा, अन्यथा जनतेला वेठीस धरणे थांबवा," अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.

✍️✍️✍️✍️✍️
संपादक 
रवी वाळके 
दे दणका न्यूज मुल
👇👇👇👇👇
जाहिरात व बातम्या करीता संपर्क करा 
मोबा,9552358222