जेसीबीने रेती उपसा करण्यास बंदी असताना रस्त्यावर एवढा मोठा रेतीचा साठा कसा?; जनतेचा सवाल





रवि वाळके/दे दणका न्यूज मुल

नदीपात्रातील रेतीचा उपसा केवळ हाताने (मॅन्युअली) करणे बंधनकारक असताना मूल तालुक्यातील विविध रेती घाटांवर नियमांची सर्रास पायमल्ली होत असल्याचे चित्र समोर येत आहे. रेती काढण्यासाठी अथवा वाहनांमध्ये भरण्यासाठी पोकलेन, जेसीबी किंवा सक्शन पंपासारख्या यांत्रिक साधनांच्या वापरास सक्त मनाई असतानाही मोठ्या प्रमाणात यंत्रांच्या साहाय्याने रेतीचा उपसा सुरू असल्याची चर्चा असून, रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात करण्यात आलेल्या रेतीच्या साठ्यामुळे जनतेत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नियमांनुसार रेती उपसा सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेतच करणे बंधनकारक आहे. मात्र तालुक्यात काही ठिकाणी दिवस-रात्र यांत्रिक पद्धतीने रेतीचा उपसा सुरू असल्याचे बोलले जात आहे. यामुळे शासनाच्या महसुलाचे लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा पाहता हा उपसा हाताने करणे शक्य नसल्याचे मत व्यक्त होत असून, जेसीबीच्या वापराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे एकीकडे घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना रेती उपलब्ध होत नसल्याने अनेकांची घरे अर्धवट अवस्थेत आहेत. लाभार्थी रेतीच्या प्रतीक्षेत चातकासारखी वाट पाहत असताना दुसरीकडे रेती कंत्राटदारांकडून नियम धाब्यावर बसवून वारेमाप रेती उपसा करून मोक्याच्या ठिकाणी साठा केला जात असल्याचे दिसून येत आहे.
यासोबतच एकाच परवान्यावर दिवसभर रेतीची वाहतूक होत असल्याचीही चर्चा रंगली आहे. महसूल विभागाचे या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत असून प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याची नाराजी नागरिक व्यक्त करीत आहेत.

✍️✍️✍️✍️✍️
संपादक 
रवी वाळके 
दे दणका न्यूज मुल
👇👇👇👇👇
जाहिरात व बातम्या करीता संपर्क करा 
मोबा,9552358222