लिलावाआधीच रेतीची लूट! कोसंबी–नलेश्वर घाटावर अवैध वाहतूक जोरात; तहसील प्रशासनावर प्रश्नचिन्ह



रवि वाळके / दे दणका न्यूज, मूल

मूल तालुक्यातील कोसंबी व नलेश्वर नदी घाटांचा अधिकृत लिलाव अद्याप झालेला नसतानाही या घाटांवरून अवैधरित्या रेतीचा मोठ्या प्रमाणावर उपसा आणि वाहतूक सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. दिवस-रात्र ट्रॅक्टर आणि ट्रकच्या माध्यमातून सुरू असलेल्या या बेकायदेशीर धंद्यामुळे शासनाच्या महसुलाला लाखो रुपयांचा फटका बसत असून, स्थानिक प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर बांधकामांची लगबग वाढली असताना रेतीची मागणीही प्रचंड वाढली आहे. याच संधीचा फायदा घेत काही रेती तस्करांनी कोसंबी व नलेश्वर घाटांवर अक्षरशः ‘मुक्त संचार’ सुरू केला आहे. विशेष म्हणजे, तहसील कार्यालयापासून घाटांपर्यंत पाळत ठेवून प्रशासनाच्या हालचालींची माहिती घेत अवैध उपसा केला जात असल्याची चर्चा आहे.
या प्रकारामुळे शासनाच्या महसुलावर मोठा परिणाम होत असताना संबंधित यंत्रणा मात्र निष्क्रिय असल्याचे चित्र आहे. अधिकृत लिलाव प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच रेतीचा साठा लुटला जात असल्याने भविष्यातील महसूलही धोक्यात आला आहे.
स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, “तहसीलदारांनी तात्काळ कारवाई करून रेती तस्करांच्या मुसक्या आवळाव्यात, अन्यथा हा गोरखधंदा आणखी वाढेल,” अशी मागणी जोर धरत आहे.

प्रशासनाने तातडीने धडक मोहीम राबवून अवैध वाहतुकीवर आळा घालणे गरजेचे आहे, अन्यथा ‘लिलावाआधीच घाट रिकामे’ अशी परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


✍️✍️✍️✍️✍️
संपादक 
रवी वाळके 
दे दणका न्यूज मुल
👇👇👇👇
जाहिरात व बातम्या करीता संपर्क करा 
मोबा,9552358222