जानाळा येथे दोन हातपंप अनेक दिवसांपासून बंद; ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त



रवि वाळके / दे दणका न्यूज, मूल

मूल तालुक्यातील जानाळा येथील गट ग्रामपंचायत हद्दीत दोन हातपंप अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. हनुमान मंदिराजवळील तसेच बाबुरावजी नैताम यांच्या घराजवळील हातपंप बंद पडले असून ग्रामपंचायतीकडून अद्याप दुरुस्तीची कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना गावात पिण्याच्या पाण्याची गरज अधिक भासत आहे. मात्र गावातील प्रमुख हातपंपच बंद असल्याने नागरिकांना दूरवरून पाणी आणावे लागत आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या संदर्भात मूल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दोन वेळा लेखी निवेदन देण्यात आले असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही न झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, सदर हातपंप तातडीने दुरुस्त करून नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा दिलासा द्यावा, अशी मागणी खुशाल कुमरे यांनी प्रशासनाकडे केली आहे. अन्यथा जनतेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा 
इशाराही देण्यात येत आहे.