दीड एकरातील तुरीच्या ढिगाला समाजकंटकांनी लावली आग; लाखोंचे नुकसान




रवि वाळके / दे दणका न्यूज, मूल

मूल तालुक्यातील मौजा कोसंबी येथील शेतकरी संतोष श्यामराव सोनवाने यांच्या दीड एकर शेतातील तुरीच्या काढणी केलेल्या शेंगांच्या ढिगाला अज्ञात समाजकंटकांनी आग लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीत संपूर्ण तूर जळून खाक झाली असून शेतकऱ्यांचे अंदाजे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
मौजा कोसंबी येथील सर्व्हे क्रमांक ७२ मधील शेतात संतोष सोनवाने यांनी यंदा तुरीची लागवड केली होती. वर्षभर कष्ट करून, मेहनत घेत पिक जोपासल्यानंतर तूर चांगल्या प्रमाणात हाती आली होती. काढणी करून शेंगा एकत्रित करून शेतात ढीग करून ठेवण्यात आले होते.
मात्र दिनांक २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी या तुरीच्या ढिगाला आग लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण ढीग जळून खाक झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतकरी धावले; मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते.
शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी, कुटुंबाला आधार मिळावा या आशेने शेतकरी वर्षभर राबत असतो. उत्पादन वाढावे यासाठी खत, बियाणे, मजुरी यावर मोठा खर्च करावा लागतो. अशा परिस्थितीत झालेल्या या प्रकारामुळे संतोष सोनवाने यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे.
घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तात्काळ शासकीय मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.
या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून, शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.