मूल तालुक्यातील दाबगाव मक्ता ते डोंगरहळदी महामार्गावरील मोठा खड्डा अपघाताला निमंत्रण देत असुन अनेक दुचाकी स्वार त्यात पडुन गंभीर जखमी होताना दिसत आहे. मात्र त्याकडे सार्वजनिक बांधकाम उपविभाग मूल चे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप जनतेनी केला आहे. तो खड्डा बुजविला गेला नाही तर अनेकांचे अपघात होऊन अनेक जण बळी जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मूल तालुक्यातील दाबगाव मक्ता ते डोंगर हळदी, बल्लारपूर कडे जाणारा हा मार्ग असुन या मार्गावरून अनेक वाहने ये जा करीत असतात. या मार्गावरून मुरूमाची व इतर साहित्याची वाहतूक सतत होत असल्याने मार्गांवर मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे दुचाकी स्वाराना या जा करण्यासाठी फार मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या खड्ड्यात अनेक दुचाकी स्वार पडुन जखमी झाले आहेत. त्यामुळे भविष्यात अनेकांचे बळी जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे टाळण्यासाठी मूल येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता यांनी लक्ष देऊन हा खड्डा बुजविण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. खड्डा न बुजविल्यास आंदोलनात्मक पवित्रा घेण्याचा इशारा जनतेनी दिला आहे.
