सुभाष उच्च प्राथमिक शाळा मूल येथे करिअर मार्गदर्शन व बक्षीस वितरण कार्यक्रम
बदलत्या काळात मोबाईलमुळे चांगल्या गोष्टी कमी व वाईट गोष्टीचा ऊहापोह मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे अनेक प्रकार घडताना दिसत आहेत यासाठी आजच्या घडीला पालकांनी आपल्या पाल्याकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे असा सूर सुभाष उच्च प्राथमिक शाळा मूल च्या वतीने आयोजित करिअर मार्गदर्शन कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा उमटला.सुभाष उच्च प्राथमिक शाळा मूल येथे तीन दिवसीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाचे औचित्य साधून खास विद्यार्थी व पालकवर्गासाठी करिअर व कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी मारोडा येथील मार्गदर्शक हर भक्त पारायण शरद सहारे महाराज यांनी विद्यार्थ्यांना भविष्यात करिअर घडविताना विविध उदाहरणे देत उज्वल भविष्यातील संधी शोधण्याचे आवाहन केले. मूल पोलिस स्टेशनच्या पोलिस उपनिरीक्षक वर्षा नैताम यांनी विद्यार्थिनीं व पालकांना समाजात घडत असलेल्या गुन्ह्याबाबत विविध उदाहरणे देत आपल्या मुलींना मोबाईल पासून दूर ठेवत आपले करिअर घडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यात मोबाईल वरील फेसबुक, इंस्टाग्राम वरील पोस्टवरून घडलेल्या घटनांची माहिती देत कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचा सल्ला दिला.
चंद्रपूरचे ॲड. डॉ. नाहीद हुसेन यांनी करिअर घडविण्यासाठी विविध वाटा आहेत मात्र त्यांचे योग्य नियोजन करून आपल्या आवडीचा अभ्यासक्रम शोधला तर नक्कीच यश मिळते हे विविध उदाहरणे देत विद्यार्थ्यांना बोलते केले. व त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला. तसेच ब्रम्हपुरीचे साहित्यिक प्रा. डॉ. धनराज खानोरकर यांनी विविध पैलूवर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्याचा कानमंत्र दिला.
या कार्यक्रमानंतर शाळेत स्नेहसंमेलच्या निमित्याने आयोजित कबड्डी, लंगडी, डॉसबॉल, चमचा गोळी, संगीतखुर्ची,सामान्यज्ञान स्पर्धा मधील प्रविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ सुभाष उच्च प्राथमिक शाळा मूल चे अध्यक्ष नरसिंग गणवेनवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. बक्षिस वितरक म्हणुन पंचायत समिती मूल च्या गटशिक्षणाधिकारी जयश्री गुज्जनवार होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे कार्याध्यक्ष अशोकराव कडूकर, सामाजिक कार्यकर्त्या प्रा. डॉ. किरण कापगते, शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा सुवर्णा पिपरे, शाळा समितीचे सदस्य प्रा. महेश पानसे, प्रा. चंद्रकांत मनीयार, ग्राम गीताचार्य सुखदेव चौथाले, गणेश मांडवकर, शाळा समितीच्या उपाध्यक्षा इंदुताई मडावी, शाळा समितीचे सदस्य पंकज निमगडे, संजय मारकवार, निलेश बंडावार, माधुरी चिंचोलकर, हर्षाली आंबेकर, रोशनी लाटेलवार, शिल्पा सातपुते,शामलता माहेरे, ममता हिरानी, प्रीती आंबेकर, स्नेहा खांबलकर, सुवर्णा घोगरे,
शाळेचे मुख्याध्यापक अविनाश जगताप, पदवीधर शिक्षक राजू गेडाम आदी उपस्थित होते.
विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्छगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक शिक्षक बंडू अल्लीवार व सहाय्यक शिक्षिका रीना मसराम यांनी संयुक्तरित्या केले.प्रास्ताविक मुख्याध्यापक अविनाश जगताप तर उपस्थितांचे आभार सहाय्यक शिक्षक योगेश पुल्लकवार यांनी मानले . तीन दिवसीय संस्कृतिक महोत्सव यशस्वी करण्यासाठी शाळेतील विद्यार्थी शिक्षक, पालक व समाजातील विविध स्तरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
