आदर्श खेडा येथील इको विकास समिती सदस्यांना विश्वासात न घेता कारभार!




रवि वाळके/दे दणका न्यूज मूल 

  वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय मूल अंतर्गत येणाऱ्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मूल तालुक्यातील आदर्श खेडा येथे इको विकास समितीतील १३ सदस्याची निवड ग्रामसभेत करण्यात आली. समितीतील सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन गावातील असलेल्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. मात्र आदर्श खेडा येथील वनरक्षक याकडे दुर्लक्ष करीत असुन सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करीत आहे.याबाबत समितीच्या सदस्यांनी तक्रार जिल्हाधिकारी चंद्रपूर व वनविभागाकडे करून चौकशीची मागणी केली आहे. 

वनविभागाची इको विकास समिती म्हणजे वनक्षेत्राच्या आजूबाबाजूच्या गावांमधील स्थानिक लोकांना वन व्यवस्थापन आणि संवर्धनात सहभागी करून घेण्यासाठी स्थापन केलेली समिती आहे. ही वन संरक्षण, वन्यजीव संरक्षण, पर्यायी उपजीविका आणि निसर्ग पर्यटनाद्वारे शाश्वत विकास साधण्याचे काम करीत असते. वन विभागाच्या मदतीने सूक्ष्म नियोजन केले जाते. त्यामुळे गावविकासाला चालना मिळत असते. मूल तालुक्यातील आदर्श खेडा येथे १३ सदस्याची समिती ग्रामसभेतून करण्यात आली आहे. मागील मे २०२५ ला या समितीकडे गाव विकासासाठी २२ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. या निधीचा योग्य पद्धतीने विनियोग व्हावा यासाठी गाव विकासाच्या योजना सुचविण्यात आल्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत वनविभाग आपल्याच मर्जीने आलेला निधी खर्च करीत असल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे. शासनाचे याकडे लक्ष वेधावे व गाव विकासाच्या योजना अंमलात याव्यात यासाठी पालकमंत्री डॉ.अशोक उईके, जिल्हाधिकारी चंद्रपूर, विभागीय वन अधिकारी चंद्रपूर व वनपरिक्षेत्र अधिकारी मूल यांकडे समितीच्या ११ सदस्यांनी तक्रार केली आहे. यात उपाध्यक्ष सुनिल दुपारे, सदस्य हंसराज मेश्राम, कवडुजी कोसनकर, किशोर गभणे, सूर्यकांत सहारे, मंगला कोसनकर, मंजुषा सहारे, निलिमा गेडाम, मिनाक्षी मुरस्कर यांनी तक्रार केली आहे.
 

सुनिल दुपारे उपाध्यक्ष इको विकास समिती आदर्श खेडा ता. मूल :- 


मानव वन्य जीव संघर्ष कमी करण्यासाठी व गाव विकासाला गती देण्यासाठी वनविभागाने ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील आदर्श खेडा या गावात इको विकास समितीची निवड ग्रामसभेतून करण्यात आली आहे. समितीने सुचविलेल्या कामाकडे लक्ष न देता वनविभाग अनावश्यक बाबीवर खर्च करीत आहे. त्यामुळे गावाला आवश्यक बाबींवर खर्च करून गाव विकासाला चालना देणे आवश्यक आहे.