मूल तालुक्यातील येरगाव येथे मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील एकमेव विहीर आटली असून उभ्या असलेल्या चारही बोअरवेल बंद अवस्थेत असल्याने ग्रामपंचायतीच्या कारभारावर ग्रामस्थांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
तापमानात वाढ होताच गावातील पाणीपुरवठा व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना व ग्रामस्थांना भटकंती करावी लागत असून दररोज पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. शासन दरवर्षी गावागावात शुद्ध व मुबलक पाणी उपलब्ध व्हावे यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करत असताना येरगावात मात्र ऐन मार्च महिन्यातच पाणीटंचाई निर्माण झाल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित होत आहेत.
गावात असलेल्या चार बोअरवेल बंद पडल्या असतानाही त्यांची दुरुस्ती किंवा पर्यायी पाणीपुरवठ्याची कोणतीही ठोस व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्रामपंचायत व पाणीपुरवठा विभागाच्या निष्क्रियतेमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.
दरम्यान, संतप्त ग्रामस्थांनी तहसीलदार मृदुला मोरे व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शिंदे यांना निवेदन देऊन तातडीने पाणीटंचाई दूर करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने त्वरित उपाययोजना न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांकडून देण्यात येत आहे.
उमेश फुलझेले , ग्रामस्थ (येरगाव) – पाणीपुरवठा योजनांवर दरवर्षी लाखो रुपये खर्च करते. मात्र योग्य नियोजन आणि देखरेख नसल्यामुळे येरगाव गावाला दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पंचायत समिती मूल यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ पाणीपुरवठा सुरळीत करून जनतेला दिलासा द्यावा.
