नगर परिषद मूलच्या उपाध्यक्षपदी राकेश रत्नावार पाचव्यांदा



रवि वाळके / दे दणका न्यूज मूल

मूल नगरपरिषदेच्या सत्ताकारणात काँग्रेसने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले असून, काँग्रेसचे आक्रमक युवा नेतृत्व राकेश यादवराव रत्नावार यांची पाचव्यांदा उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीमुळे नगरपरिषदेत काँग्रेसचा दबदबा अधिक भक्कम झाला असून विरोधी गटांना हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
नगरपरिषद मूल येथे काँग्रेस गटनेतेपदी निवड झाल्यानंतर लगेचच उपाध्यक्षपदावर त्यांची बिनविरोध निवड होणे, हे राकेश रत्नावार यांच्या वाढत्या राजकीय ताकदीचे स्पष्ट संकेत मानले जात आहेत. अल्पवयात राजकारणात पाऊल ठेवून सातत्याने जनतेचा विश्वास संपादन करणारे रत्नावार आज मूलच्या राजकारणातील प्रभावी चेहरा बनले आहेत.
काँग्रेसचे प्रदेशस्तरीय नेते संतोषसिंह रावत यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळख असलेले रत्नावार हे संघटनात्मक ताकद आणि आक्रमक निर्णयक्षमतेसाठी प्रसिद्ध आहेत. कृषी उत्पन्न बाजार समिती, मूलच्या सभापतीपदावर दुसऱ्यांदा विराजमान झाले आहेत. शेतकरी हिताचे धाडसी निर्णय घेतले असल्याने ग्रामीण भागात त्यांची मजबूत पकड निर्माण झाली आहे.
अलीकडील नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेसने नगराध्यक्ष पदासह तब्बल १८ नगरसेवक निवडून आणत विरोधकांचे गणित पूर्णपणे बिघडवले आहे. या पार्श्वभूमीवर राकेश रत्नावार यांची उपाध्यक्षपदी निवड म्हणजे काँग्रेसच्या सत्तास्थैर्याचा ठोस शिक्का असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
खासदार प्रतिभा धानोरकर, माजी विरोधी पक्षनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस संतोषसिंह रावत यांच्या नेतृत्वाखाली व मूल च्या नगराध्यक्षा एकता समर्थ व सर्व नगरसेवक यांच्या सहकार्यातून 
मूल शहराच्या विकासासाठी आक्रमक धोरण राबवण्याचा निर्धार नवनियुक्त उपाध्यक्ष राकेश रत्नावार यांनी केला आहे. येत्या काळात मूल नगरपरिषदेत विकासकामांना गती मिळणार असून, राजकीय रणधुमाळी अधिक तीव्र होण्याचे संकेतही या निवडीने दिले आहेत.